जागतिक पितृदिन – २१ जून २०२६

जागतिक पितृदिन – २१ जून २०२६

Published On: June 21, 2026

  • जागतिक पितृदिन – २१ जून २०२६
माझे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर : माझ्या आयुष्याचे दोन दीपस्तंभ आज जागतिक पितृदिनाच्या निमित्ताने मी कृतज्ञतेने आणि अभिमानाने माझ्या वडिलांना वंदन करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक यशामागे त्यांचे कष्ट, त्याग, दूरदृष्टी आणि शिक्षणावरील नितांत श्रद्धा आहे. माझे वडील एक साधे कामगार होते, पण त्यांची स्वप्ने खूप मोठी होती. त्यांना आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे, समाजाची सेवा करावी, ही मनापासून इच्छा होती. मी सुमारे १२ वर्षांचा असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांनी मला त्यांच्या परिचयातील एका जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांच्या दवाखान्यात कामासाठी ठेवले. तेव्हा मला त्यामागचा हेतू समजला नव्हता; पण आज मागे वळून पाहताना जाणवते की, माझ्या वैद्यकीय शिक्षणाचा पाया तेव्हाच रचला जात होता. माझ्या आईच्या आजारपणात त्यांनी डॉक्टरांचे महत्त्व जवळून अनुभवले होते. त्यामुळेच त्यांनी मला डॉक्टर बनवण्याचा निर्धार केला. शिक्षणासाठी धडपडणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शक्य ती मदत केली. मी अकरावीत असताना ते सेवानिवृत्त झाले; परंतु माझे शिक्षण थांबू नये म्हणून त्यांनी पुन्हा एका कंपनीत नोकरी स्वीकारली. वयाच्या ४५ वर्षांनंतर झालेल्या मुलाचे भविष्य घडवण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट आणि त्याग आजही माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. माझ्या वडिलांचे दुसरे मोठे योगदान म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग. ऑक्टोबर १९५६ मध्ये बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर ते खटाव तालुक्यातील गावोगावी जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, शिक्षणाचे महत्त्व, स्वाभिमान, बंधुता आणि बौद्ध धम्माची मूल्ये लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक होते. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा बाबासाहेबांचा संदेश त्यांनी आपल्या जीवनातून जगला. आज या पितृदिनी मी माझ्या आयुष्यातील दुसऱ्या महान पित्यालाही अभिवादन करतो – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दलित, आदिवासी, वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देणारे ते खरे अर्थाने समाजपिता आहेत. त्यांनी आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखविला. भारतीय राज्यघटनेद्वारे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले. महिलांना मतदानाचा अधिकार आणि समानतेची हमी देणाऱ्या दूरदर्शी विचारांमुळे भारत जगातील प्रगत लोकशाही राष्ट्रांपैकी एक बनला. आज मला अभिमानाने नमूद करावेसे वाटते की, माझ्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. क्षयरोग आणि श्वसनरोग क्षेत्रातील जवळपास चार दशकांच्या सेवेला मान्यता देत मला “Top Pulmonologist – Doctor of the Year 2026” हा बहुमान SiliconIndia Magazine च्या विशेषांकासाठी प्राप्त झाला आहे. तसेच क्षयरोग विषयातील माझ्या पीएच.डी. संशोधनास Kennedy University, USA ची मान्यता मिळाली आहे. हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या वडिलांच्या त्यागाचा, माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाचा, माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्याचा आणि माझ्या रुग्णांच्या विश्वासाचा आहे. आज या पवित्र दिवशी मी माझ्या वडिलांना, भगवान गौतम बुद्धांना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. त्यांनी दिलेल्या मूल्यांमुळेच एका कामगाराच्या मुलाला डॉक्टर, शिक्षक, संशोधक आणि समाजसेवक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. वडील हे फक्त जन्मदाते नसतात; ते स्वप्नांना दिशा देणारे, संघर्षाला सामर्थ्य देणारे आणि यशाचा पाया घालणारे पहिले गुरु असतात. सर्व पित्यांना जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏 नमो बुद्धाय । जय भीम । 🙏 डॉ. राजेंद्र तातू ननावरे एमबीबीएस, टीडीडी, डीईटीआरडी, एएफआयएच, डीपीएच, एफआयपी, एसीसीपी पल्मोनॉलॉजिस्ट, मुंबई फॅकल्टी – CPS, परळ, मुंबई एडिटोरियल मॅनेजर – इंडियन जर्नल ऑफ ट्युबरक्युलोसिस पीएच.डी. स्कॉलर (क्षयरोग) – Kennedy University, USA