जागतिक मेंदू दिन २०२६ निरोगी फुफ्फुसे – निरोगी मेंदू : श्वसनविकारांचा मेंदूवरही गंभीर परिणाम — डॉ. राजेंद्र तातू ननावरे

जागतिक मेंदू दिन २०२६ निरोगी फुफ्फुसे – निरोगी मेंदू : श्वसनविकारांचा मेंदूवरही गंभीर परिणाम — डॉ. राजेंद्र तातू ननावरे

Published On: July 24, 2026

जागतिक मेंदू दिन २०२६ निरोगी फुफ्फुसे – निरोगी मेंदू : श्वसनविकारांचा मेंदूवरही गंभीर परिणाम — डॉ. राजेंद्र तातू ननावरे मुंबई, २४ जुलै २०२६ : जागतिक मेंदू दिनानिमित्त ज्येष्ठ श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र तातू ननावरे यांनी फुफ्फुसांचे आरोग्य आणि मेंदूचे आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध असल्याचे सांगितले. श्वसनविकारांमुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो. डॉ. ननावरे यांच्या मते सीओपीडी, दमा, न्यूमोनिया, इंटरस्टिशियल लंग डिसीज (ILD), स्लीप अॅप्निया तसेच गंभीर क्षयरोग यांसारख्या आजारांमध्ये मेंदूला आवश्यक ऑक्सिजन कमी मिळतो. त्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता, विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि बौद्धिक कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. ते पुढे म्हणाले की धूम्रपान, तंबाखूचे सेवन, वायूप्रदूषण, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वाढलेले कोलेस्टेरॉल हे फुफ्फुसांसोबतच मेंदूच्या आरोग्यासाठीही घातक ठरतात. त्यामुळे स्ट्रोक, विस्मरण (डिमेन्शिया) आणि इतर न्यूरोलॉजिकल विकारांचा धोका वाढतो. डॉ. राजेंद्र तातू ननावरे यांनी श्वसनविकारांचे वेळेत निदान, योग्य उपचार, धूम्रपानमुक्त जीवनशैली, नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, लसीकरण आणि नियमित आरोग्य तपासणी यावर विशेष भर दिला. तसेच त्यांनी मेंदूचा क्षयरोग (ट्युबरक्युलस मेनिंजायटिस) हा क्षयरोगाचा अत्यंत गंभीर प्रकार असून तीव्र डोकेदुखी, ताप, उलट्या, मान आखडणे, बेशुद्धावस्था किंवा झटके अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. “निरोगी फुफ्फुसे म्हणजे निरोगी मेंदू. मेंदूचे आरोग्य जपायचे असेल तर सर्वप्रथम श्वसनसंस्थेचे आरोग्य जपा,” असा संदेश डॉ. राजेंद्र तातू ननावरे यांनी दिला. डॉ. राजेंद्र तातू ननावरे एमबीबीएस, TDD, DETRD, AFIH, DPH ज्येष्ठ श्वसनविकार तज्ज्ञ व छातीरोग विशेषज्ञ स्पेशालिटी मेडिकल कन्सल्टंट, ग्रुप ऑफ टीबी हॉस्पिटल्स, शिवडी, मुंबई एडिटोरियल मॅनेजर, इंडियन जर्नल ऑफ ट्युबरक्युलोसिस